Friday, 5 June 2020

वारस कायदा

*वारस कायदा*
       भारतीय वारसा हक्क कायदा 1925 प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने जिवंत असताना आपले इच्छापत्र किंवा मृत्युपत्र करून ठेवले असेल, तर त्याची अंमलबजावणी म्हणजे मालमत्तेचे हस्तांतरण त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्यातील कोणत्याही तरतुदींच्या अगोदर होते; मात्र अशाप्रकारचे इच्छापत्र किंवा मृत्युपत्र केलेले नसेल, तर सदर व्यक्ती विनामृत्युपत्र मृत झाली असे समजण्यात येते आणि कायद्यातील तरतुदी मिळकत या हस्तांतरासाठी अस्तित्वात येतात. सदर मृत व्यक्तीची मिळकत वारसा हक्काने संबंधित वारसांना प्राप्त होते. मृत व्यक्तीची मिळकत त्या मृत व्यक्तीस लागू पडत असलेल्या वारसा कायद्याप्रमाणे वारसांनाच मिळते. हिंदू, बौद्ध, शीख व जैन यांना हिंदू उत्तराधिकार अधिनियम 1956 च्या तरतुदी आपोआप लागू होतात. मुस्लिम धर्मीयांना मुस्लिम वैयक्तिक कायदे लागू पडतात. पारशी धर्मीयांना भारतीय वारसा हक्क कायदा 1925 लागू पडतो. या कायद्याचे कलम 50 ते 56 पारशी धर्मीयांना, तर कलम 32 ते 49 च्या तरतुदी भारतीय ख्रिश्च न व इतरेतरांना लागू पडतात.
हिंदू वारसा कायदा 1956 :
हा कायदा सर्व हिंदूंना लागू पडतो. यात बौद्ध, जैन व शीख यांचाही समावेश होतो. या कायद्याचे कलम 8 प्रमाणे वारसांचे मूलभूत चार वर्ग पडतात, ते खालीलप्रमाणे आहेत :

*वर्ग- 1 : वर्ग १ च्या वारसामध्ये १२ वारस येतात तसेच नवीन सुधारणा नुसार ४ वारस सामविष्ट केले असून आता वर्ग १ मध्ये १२+४=१६ वारस येतात*
मुलगा, मुलगी, विधवा, आई, पूर्वमृत मुलाचा मुलगा, पूर्वमृत मुलाची मुलगी, पूर्वमृत मुलीचा मुलगा, पूर्वमृत मुलीची मुलगी, पूर्वमृत मुलाची विधवा, पूर्वमृत मुलाचा नातू, पूर्वमृत मुलाची नात, पूर्वमृत मुलाची विधवा नातसून

*हिंदू उत्तर अधिकार सुधारणा अधिनियम २००५ कलम ७ अन्वये वर्ग च्या वारसांना अनुसूचीमध्ये खालील ४ वारस जोडले गेले आहेत*

१.पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीचा मुलगा ,
२.पूर्वमृत मुलीच्या पूर्वमृत मुलीची मुलगी,
३.पूर्वमृत मुलाच्या पूर्वमृत मुलीची मुलगी,
४.पूर्वमृत मुलाच्या पूर्व मुलीचा मुलगा

*वर्ग- 2 :*
1) वडील
2) मुलाच्या मुलाचा मुलगा, मुलाच्या मुलीची मुलगी, भाऊ, बहीण
3) मुलीच्या मुलाचा मुलगा, मुलीच्या मुलाची मुलगी, मुलीच्या मुलीचा मुलगा, मुलीच्या मुलीची मुलगी
4) भावाचा मुलगा, बहिणीचा मुलगा, भावाची मुलगी, बहिणीची मुलगी
5) वडिलांचे वडील, वडिलांची आई
6) वडिलांची विधवा, भावाची विधवा
7) वडिलांचा भाऊ, वडिलांची बहीण
8) आईचे वडील, आईची आई
9) आईचे भाऊ, आईची बहीण
यात एकच आई; परंतु भिन्न वडील असलेल्या भाऊ- बहिणींचा समावेश होत नाही.
वर्ग- 3 :
मृताचे पितृबंधू म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तक म्हणून पूर्णपणे पुरुषांद्वारे संबंध नसलेल्या व्यक्ती.
वर्ग- 4 :
मृताचे मातृबंधू म्हणजेच रक्ताच्या नात्यामुळे किंवा दत्तकाद्वारे पूर्णपणे पुरुषाद्वारे संबंध नसलेल्या व्यक्ती.

*वारसांची नियमावली :*
जे वारस वरीलप्रमाणे मृत्युपत्र न करता मरण पावतील, अशा हिंदू पुरुषांच्या वारसांना पुढील क्रमाने वारसा हक्क मिळेल.
1) प्रथमतः वर्ग- 1 चे वारस
ते नसल्यास,
2) दुसऱ्यांदा वर्ग- 2 च्या क्रमाने वारस. यात पहिल्यात कोणी नसेलच तर दुसरा व दुसऱ्यात कोणी नसेलच तर तिसरा या क्रमाने हिस्सा मिळतो.
3) तिसऱ्यांदा वर्ग- 1 व वर्ग- 2 चे कोणीही वारस नसेलच, तर वर्ग- 3 च्या वारसांना हक्क पोचतो.
4) चौथ्यांदा वर्ग- 1, वर्ग- 2 किंवा वर्ग- 3 चे वारसच नसतील, तर वर्ग- 4 च्या हक्कदारांना हक्क पोचतो.
5) यापैकी कोणीही वारस नसेल तर मिळकत सरकार जमा होते.

*वर्ग 1 च्या उत्तराधिकारांचा नियम :*
1) मृत खातेदाराची विधवा किंवा अधिक विधवा असतील, तर सर्व विधवा एकत्रितपणे एक हिस्सा घेतील
2) मृत खातेदाराचे हयात असलेले मुलगे, मुलगी आणि आई प्रत्येकी समान एक हिस्सा घेतील
3) मृत खातेदाराच्या प्रत्येक पूर्वमृत मुलाच्या किंवा पूर्वमृत मुलीच्या खात्यातील सर्व वारस मिळून एक हिस्सा घेतील. यात,
4) वरील 3 प्रमाणे पूर्वमृत मुलाच्या खात्यातील वारसा अशाप्रकारे करण्यात येईल, की त्याची विधवा (अनेक असल्यास एकत्रितपणे) आणि हयात मुलगे, मुली यांना समान प्रमाणात हिस्सा मिळेल, तसेच पूर्वमृत मुलाच्या प्रत्येक शाखेला सम प्रमाणात हिस्सा मिळेल.
वरील 3 प्रमाणे पूर्वमृत मुलांच्या शाखेतील वारसांमध्ये अशाप्रकारे वाटप करण्यात येईल, की प्रत्येकाला समान हिस्सा मिळेल.

*वर्ग 2 च्या वारसांमध्ये संपत्तीचे वितरण (वर्ग 1 चे वारस नसल्यास) :*
यामध्ये 1 ते 9 क्रमांकाचे वारस येतात. यात त्या क्रमांकात जेवढे वारस असतील, त्यांना समान प्रमाणात वाटप होते; परंतु त्यानंतर ते नसल्यास पुढच्या क्रमांकातील वारसांचा क्रमाने विचार होतो.

*वर्ग 3 व 4 मधील* *उत्तराधिकाऱ्यांचा क्रम :*
नियम 1- दोन वारसांपैकी ज्याला वंशक्रमातील श्रेणीत स्थान असेल त्याला प्राधान्य मिळेल.
नियम 2- कोणताही वारस दुसऱ्यापेक्षा अग्रहक्क मिळण्यास हक्कदार नसेल, ते एकाचवेळी समान हिस्सेदार होतील.

*हिंदू स्त्रीची मिळकत :*
हिंदू स्त्री ही तिच्या कब्जातील कोणतीही संपत्ती मर्यादित नव्हे, तर संपूर्ण स्वामित्वाने धारण करेल. तथापि मिळकत दान म्हणून किंवा मृत्युपत्राद्वारे किंवा कोणत्याही लेखाद्वारे किंवा दिवाणी न्यायालयाच्या हुकमान्वये किंवा आदेशान्वये किंवा एखाद्या निवाड्याद्वारे संपादित केलेली असेल, तर अशा संपत्तीला या कायद्यातील तरतुदी लागू पडत नाहीत.

*विनामृत्युपत्र मृत हिंदू स्त्रीच्या संपत्तीची विल्हेवाट ठरविण्याचा क्रम व नियम-*
1) पहिल्यांदा मुलगे व मुली (यात पूर्वमृत मुलगा वा मुलगी किंवा त्यांची अपत्ये) आणि पती यांच्याकडे सम प्रमाणात
- दुसऱ्यांदा पतीच्या वारसाकडे
- तिसऱ्यांदा माता किंवा पित्याकडे
- चौथ्यांदा पित्याच्या वारसाकडे
- शेवटी मातेच्या वारसाकडे
2) तथापि हिंदू स्त्रीला तिच्या पित्याकडून किंवा मातेकडून संपत्ती मिळालेली असेल आणि तिला मुले किंवा नातवंडे नसल्यास तिच्या पित्याच्या वारसांकडे जाईल.
3) हिंदू स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा सासरकडून वारशाने मिळालेली कोणतीही संपत्ती, तिला मुले किंवा नातवंडे नसल्यास पतीच्या वारसांकडे जाईल. यात,
- क्रमाने एकाच नोंदीतील समाविष्ट असलेल्या वारसांना एकाच वेळी समान वारसा मिळेल
- हयात मुला- मुलींना पूर्वमृत मुलांचा हिस्सा धरून समान हिस्सा मिळेल – कायद्याचे कलम 15 नुसार अस्तित्वात असलेले क्रम त्याचप्रमाणे असतील.
नात्यातील क्रम :
सख्ख्या नात्यातील वारसांना सापत्न नात्यातील वारसांपेक्षा प्रथम प्राधान्य मिळेल.


*गर्भातील अपत्याचा हक्क :*
विनामृत्युपत्र खातेदारांच्या मृत्युसमयी जर अपत्य गर्भात होते व नंतर जिवंत जन्मले असेल, तर त्याला जिवंत असलेल्या मुलाप्रमाणे अधिकार मिळतील.


*श्री.मोहसिन शेख ,मंडळ अधिकारी*
*तालुका-कर्जत* *जिल्हा-अहमदनगर*
*Email:-mohsin7128a@gmail.com*
*Blog:-mohsin7-12.blogspot.com*
*Contact:-9766366363*

No comments: