Friday, 28 October 2016

महिलांच्या वारसा हक्काच्या संदर्भात एक महत्वाचा लेख...



हिंदू वारसा अधिनियमाच्या कलम 6 मध्ये महाराष्ट्र राज्यात दि. 22 जून 1994 रोजी तर केंद्राने दि.9 सप्टें 2005 रोजी दुरुस्ती केली असून ही दुरुस्ती आता संपूर्ण देशात लागू झाली आहे..

नेमकी दुरुस्ती काय ?

एखाद्या कुटुंबात वडिलोपार्जित मिळकतीत 1956 च्या वारसा कायद्यानुसार मुलीला फक्त वडिलांच्या पश्चात त्यांच्या हिश्श्यामधील वारसा हक्काने मिळणारा हिस्सा प्राप्त होतो, तर मुलांना वडिलांच्या पश्चात त्यांच्या हिश्श्या मधील वारसा हक्काने मिळणारा हिस्सा अधिक जन्मतःच सहहिस्सेदार म्हणून प्राप्त होणारा हिस्सा असा दोन्ही बाजूंनी हिस्सा प्राप्त होतो, ही तफावत दूर व्हावी या दृष्टीने हिंदू वारसा अधिनियमाच्या कलम 6 मध्ये दुरुस्ती करणेत आली..

याचा मुख्य उद्देश असा की मुलींना देखील त्यांच्या माहेरच्या अथवा वडिलांकडील वडिलोपार्जित मिळकतीत जन्मतःच सह हिस्सेदार म्हणून धरले जाईल व मुलाप्रमाणेच वडिलोपार्जित संपत्ती मधील सर्व अधिकार मुलींना देखील प्राप्त करुन देण्यात आले..

तथापि हिंदू वारसा अधिनियमातील ही दुरुस्ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू होते किंवा नाही ? असा प्रश्न निर्माण झाला असता  मा.सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश विरुद्ध फुलवती या खटल्यात असा निर्णय केला की, ज्या दिवशी या दुरुस्त कलमाला मान्यता मिळाली त्या दिवसापासून या तरतुदी लागू होतील, म्हणजेच दि.9 सप्टें 2005 पासून पुढे लागू होतील, थोडक्यात हिंदू एकत्र कुटुंबातील वडिलोपार्जित मिळकती मध्ये ज्या मुलींचे सहहिस्सेदार वडील दि.9 सप्टें 2005 रोजी हयात असतील अशा मुलींनाचं एकत्र कुटुंबाच्या वडिलोपार्जित मिळकतीत जन्मतःच सह हिस्सेदार म्हणून हक्क प्राप्त होईल, या अटीची पूर्तता करु न शकणाऱ्या महिलांना वडिलोपार्जित मिळकतीत जन्मतःच सह हिस्सेदार म्हणून हक्क प्राप्त होणार नाही, अशा महिलांना फक्त वारसा हक्काने मिळणारा हिस्सा यावरचं हक्क सांगता येईल, ही दुरुस्ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नसल्याचा निर्णय मा.सर्वोच्च न्यायालयाने केल्याने या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत..

No comments: